Pages

Monday, July 23, 2012

मला बापूनी काय दिले .....


हरी ओम


मला बापूनी काय दिले .....खरेच हे सांगण्यास शब्द आणि त्याहून  हे जीवनच अपुरे आहे....एवढे भरभरून दिले आहे मला माझ्या सदगुरूने. तरीही मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो दररोजची आन्हिक उपासना, श्री वर्धमान व्रताधीराज आणि श्री रणचंडिका प्रपत्तीचा. एका मनुष्याला शाश्वत सुख अनुभवण्यास काय लागते. थोडा विचार केला तर आध्यात्म आपल्याला हेच सांगताना दिसून येते की त्याचे सुख हे त्याच्या कर्म आणि प्रारब्धानुसार ठरते. आता कर्म काही आकाशातून पडत नाही ना आपल्या अंगावर....जे आपण केले या जन्मात तसेच मागील जन्मात त्याचेच कर्म फळ आपणास भोगावे लागते. आणि ह्याच कर्मातून जे जे काही  प्रारब्ध निर्माण झाले त्याचे परिणाम स्वरूप मला किती पटीत सुख मिळणार हे ठरत असते. मी कुठल्या कुळात जन्मणार कुठल्या परिस्थितीत वाढणार आणि जे जे भौतिक सुखाच्या व्याख्येत बसते ते सर्व मला लाभते माझ्याच करणीने. जर हे चांगले झाले तर मी खुश असतो आणि वाईट झाले तर मात्र दैवाला दोष देत राहतो कि माझे नशीबच फुटके म्हणून. पण ह्या सर्व गोष्टीना छेद देवून शाश्वत सुखाचा राजमार्ग दाखवला तो माझ्या बापूने. रोजच्या आन्हिक उपासनेने मी माझ्या आयुष्यातील पापाचा एकेक घडा रोज फोडत असतो. फार मोठी गोष्ट जी जवळ जवळ अशक्यच वाटते ती येथे घडते. कारण मी पुण्य कमावले म्हणून माझे पाप हे कधीही कमी होत नाही ते आहे त्या प्रमाणात तेथेच राहते आणि त्याचे फळ मला भोगावेच लागते. पाप नष्ट करायचा एक मार्ग आहे लाभेविण प्रेम...........म्हणजे फक्त त्या परमात्म्याचे प्रेम मिळवण्यासाठी केले गेलेले माझे त्याच्यावरचे प्रेम.आजच्या घडीला या कलीयुगात जेथे आपण आपल्या रक्ताच्या नात्यांवर किती प्रेम करत असतो ते आपल्याला माहित आहे. सर्व काही व्यवहार बघून केले जाते. मग ते लग्न असो कि मुलांचे संगोपन सगळीकडे देवाण घेवाणीचीच भाषा चालते. हा माझा सदगुरूच एकमेव असा आहे कि ज्याला माझ्याकडून फक्त भक्तीचीच अपेक्षा असते इतर भौतिक गोष्टींची तो जरासुद्धा लालसा बाळगत नाही. पण मी मात्र असे निर्व्याज प्रेम त्याच्यावर करण्यास कमी पडतो. फक्त त्याचे प्रेम मिळावे म्हणून त्याच्यावर प्रेम करत राहणे मला लगेच जमू शकत नाही. अशावेळी हा कारुण्याचा सागर मला माझी पापे  धुण्यासाठी आन्हिक उपासनेचा मार्ग खुला करतो.  
ही गोष्ट झाली पापाचे घडे फोडण्यासाठी .... 
पण आजवर माझे एवढे मनुष्य जन्म झाले ह्या कल्पामध्ये (सत्ययुगापासून ते  आज कलीयुगापर्यंत) की माझ्या पापाचे नुसते डोंगर उभे राहिलेले असतात जे माझ्या सुखाच्या वाटचालीच्या आड येत असतात. आणि ज्याअर्थी मी कलियुगात जन्मास आलोय म्हणजे मी पूर्वकर्मानुसार असे अनेक डोंगर उभारण्यास कारणीभूत ठरलो आहे हे नक्की. ह्यालासुद्धा माझा बापू उपाय दाखवतो ते श्री वर्धमान व्रत करून आपले पुढील जन्म अधिक चांगले करण्याचा. आणि ह्या सर्वांवर कळस चढवला जातो ते माझ्यातील भीती घालवून मला शूर समर्थ बनवण्यासाठी घेतले गेलेले त्याचे प्रयास म्हणजेच श्री रणचंडिका प्रपत्ती. कारण मी सर्व सुखे कधी उपभोगू शकतो की जेव्हा मी ती सर्व मर्यादा मार्गाने उचित परिश्रम करून कमावेन तेव्हाच. आणि हे सारे करण्यासाठी मला समर्थ असणे आवश्यक आहे अगदी सर्व क्षेत्रात सर्व बाजूने समर्थ असणे म्हणजेच पराक्रम. मला माझा सदगुरू पराक्रमी बनवतो. हे सारे करण्यासाठी माझी वैयक्तिक ताकद नक्कीच अगदी क्षुल्लक आहे म्हणजेच आज मी जो काही सुखी आहे त्यात त्याचा वाटा अपरंपार आहे. 
मला फक्त एकच करायचे आहे........
त्याची आठवण नेहमी ठेवायची. बाकी सारे तोच करत असतो. श्री राम 



1 comment:

  1. Excellent...... shree Ram, Kharach aapla Bapu aaplyasathi kay kay karat asto hyachi aaplyala kalpana dekhil naste, labhevin priticha sakshatakar mhanje ha aapla bapu. Hari Om

    ReplyDelete